दुबई – तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यावर महिला क्रिकेटला तसेच महिलांच्या कोणत्याही क्रीडा प्रकारातील सहभागाला नकार दिल्यामुळे त्यांच्यावर नवे संकट ओढावले आहे. अफगाणीस्तानच्या महिला खेळाडूंनी कोणत्याही खेळात सहभागी होऊ नये असे सांगत त्यांच्या क्रिकेट संघालाही खेळण्यास मनाई करत तालिबानने आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर आयसीसीने त्यांना इशारा देत त्यांच्या पुरुष संघाचा कसोटी क्रिकेटचा दर्जा काढून घेतला जाईल असे सूचित केले आहे.
अफगाणिस्तानच्या महिलांना कोणत्याही प्रकारचा खेळ खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय तालिबानने घेतला. अफगाणिस्तानच्या महिला कोणताही खेळ खेळू शकणार नाहीत. त्यात क्रिकेटचाही समावेश आहे. क्रिकेटमध्ये महिलांचा चेहरा तसेच झाकलेला नसतो. तसेच त्यांचे उघडपणे मैदानात खेळणे इस्लामच्या विरोधात आहे, असे तालिबानने म्हटले आहे.
ज्या देशातील पुरुष खेळाडूंच्या संघासह महिला संघालाही खेळण्याची परवानगी दिली जात असेल तरच त्या देशाच्या संघाला कसोटी दर्जा आयसीसीकडून दिला जातो. आता अफगाणीस्तानमध्ये महिला संघावर बंदी लावली जाणार असेल तर त्यांच्या पुरुष संघाचा कसोटी दर्जाही संकटात आला आहे, असेही आयसीसीने म्हटले आहे.
2017 साली अफगाणिस्तानने आयसीसीची अट पूर्ण केली होती व त्यावेळी त्यांच्या पुरुष संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला गेला होता. आता तालिबानच्या या निर्णयामुळे त्यांच्या महिला संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौराही रद्द होणार आहे.