नवी दिल्ली – हुबळी- धारवाड पश्चिम या आपल्या मतदार संघात ५८ एकर जमीन देऊनही इन्फोसिस या बड्या कंपनीने एकही रोजगार निर्माण केला नाही अशी थेट टीका करत या कंपनीला दिलेली जमीन परत घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अरविंद बेल्लाड यांनी केली आहे.
कर्नाटक विधानसभेत उप विरोधी पक्ष नेते असलेले बेल्लाड आपल्या सभागृहातील भाषणात म्हणाले माझ्या मतदारसंघात एक औद्योगिक वसाहत आहे. त्यात इन्फोसिसने जमीन घेतली आहे.
मात्र त्यांनी आजपर्यंत तेथे एकालाही नौकरी दिली नाही. १ कोटी रूपयांची ही जागा आपण शेतकऱ्यांकडून कंपनीला केवळ ३५ लाख रूपयांत मिळवून दिली होती. तुमच्या मुलांना येथे रोजगार मिळेल असे आश्वासन मी शेतकऱ्यांना दिले होते.
आज मी त्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्या बेल्लाड यांनी ही भूमिका मांडली आहे.