वडापुरी -महागाईची झळ आता चिकनलासुद्धा बसली आहे. दर पुन्हा एकदा 240 रुपये प्रती किलोवर गेले आहेत. मांसाहारी लोकांचे स्वस्तातील खाणे अशी चिकनची ओळख, सर्वसामान्य नागरिकांना सहज परवडणारे खाद्य म्हणून असणाऱ्या चिकन आता महाग झाले आहे. पूर्वी हे दर 180 ते 200 रुपये किलोपर्यंत होते.
पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, वाहतूक, पक्षांच्या वाढलेल्या किंमतीमुळे चिकनचे दर वाढले आहेत. याचा फटका, ग्राहकांसह हॉटेल चालकांना बसला आहे. लॉकडाऊनमध्ये चिकनच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. आता पुन्हा दर प्रत्येक आठवड्याला वाढत आहेत. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य महाग झाल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या पोल्ट्रीसाठी एक पक्षी 41 रुपयांपर्यंत येतो. तर त्यांना लागणारे खाद्य हे 3 हजार 300 रुपयांच्या पुढे गेले आहे.
पक्षांच्या सांभाळ करण्यास 100 ते 105 रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे पोल्टी चालक हे चिकन विक्रेत्यांना जिवंत कोंबडी 150 रुपये दराने विक्री करत आहे. त्यामुळे ग्राहकांना चिकन 240 रुपये प्रती किलो खरेदी करावे लागते. तसेच ग्राहकांनी जिवंत कोंबडी खरेदी केल्यास ती 150 रुपये किलो आहे. चिकनचे दर वाढल्याने सध्या विक्रीत घट झाली आहे. शिवाय हॉटेल चालकांना महाग चिकन घेऊन पूर्वी आहे त्या किंमतीत चिकनचे पदार्थ विक्री करावे लागत आहे.
गावरान चिकन 500 रुपये किलो
सध्या चिकन विक्रेत्यांकडे गावरान जिवंत कोंबडा 500 रुपये किलो दराने मिळत आहे. तर यामध्ये डुप्लीकेट गावरन म्हणून ओळखले जाणारे कोंबडे हे 280 रुपये किलो झाले आहे; मात्र याला सुद्धा ग्राहक नसून विक्री खूप कमी झाल्याचे विक्रेते निजाम मुबारक पठाण यांनी सांगितले.