वाघोली -वाघोलीत पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर बंद असलेली जीवनावश्यक वस्तू किराणा माल व भाजीपाला, फळे विक्री दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत. प्रभारी उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारी (दि. 11) काढलेल्या आदेशाने वाघोलीतील गोरे वस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर ही चार ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. यापुढे संपूर्ण वाघोली गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असणार नाही.
करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व काही विषयांवर चर्चा करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार वाघोली ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे स्थानिक अधिकारी यांची बैठक सोमवार (दि. 11) बोलाविण्यात आली होती.
वाघोलीमध्ये सापडलेले चारही करोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याने किराणा, भाजीपाला दुकाने उघडण्याबाबत नागरिकांकडून मागणी केली जात आहे. मात्र, वाघोली प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा मुद्दा पुढे आला. जोपर्यंत प्रशासनाचा लेखी आदेश येत नाही तोपर्यंत कसे सुरू करणार असा मुद्दा बैठकीत पुढे आला होता.
लोणीकंद पोलीस ठाण्यातून मिळणार पास
लॉकडाऊनच्या काळात वाघोली व परिसरामध्ये अडकलेल्या नागरिकांना राज्याबाहेर जाण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने पास देण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहनाची कागदपत्रे व इतर कागदपत्रे आवश्यक असणार आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी ऑफलाइन पास घेण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
ही आहेत मायक्रो कंटेन्मेंट झोन
हवेलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनील कोळी यांनी वाघोलीमध्ये रुग्ण सापडलेल्या गोरे वस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर ही चार ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नवीन आदेशाने घोषित केले आहेत. यानुसार जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयीसुविधा व दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे. याबरोबरच केसनंद येथील जोगेश्वरी रोड-सद्गुरूपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, मांजरीखुर्द गावठाण देखील मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
निवारा छावणीतील मजूर मध्यप्रदेशकडे रवाना
वाघोली येथील कल्याण मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा छावणीतून मध्यप्रदेश येथील 53 मजुरांना दोन बसमधून रवाना करण्यात आले. लोणीकंद पोलिसांच्या वतीने त्यांना पास बनवून देण्यात आले, तर बससाठी येणाऱ्या खर्चासाठी वाघोली येथील कुणाल खेमेजा व त्यांच्या एसएफएस 98 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित 30 हजार रुपये रक्कम गोळा करून दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी (दि.11) दोन बस मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. छावणीमध्ये उत्तरप्रदेश भागातील 10 मजूर व काही महाराष्ट्रातील मजूर आहेत.
बाहेरून आलेल्यांची माहिती कळवा
स्थलांतरित कामगार, मजूर, अडकलेले नागरिक बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून वाघोली परिसरामध्ये आलेले आहेत. अशा नागरिकांची माहीती ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ही माहिती कळविण्याची जबाबदारी सोसायटी चेअरमन, घरमालक, स्थानिक नागरिक यांच्यावरही टाकण्यात आली आहे. जे माहिती लपवतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. वाघोलीत आलेल्या 300 नागरिकांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. बाहेरून वाघोलीत आलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य केंद्राच्या 7410088382 या हेल्पलाइन क्रमांकावर कळवावी.