औरंगाबाद – औरंगाबादमधील राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियशरण ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर महाराजांवर (वय 61) अज्ञात सात ते आठ अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियशरण महाराज व त्यांचे साधक रात्री झोपलेले असताना बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्या सेवा आश्रमाच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी अचानक महाराज व त्यांच्या साधकांवर जबर मारहाण करत शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर जखमी महाराजांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर बुधवारी सकाळी श्वान पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु कुठलाही माग निघाला नाही.