#INDvWI 1st T20 : भारतीय संघाचा विंडीजवर ‘विराट’ विजय

हैदराबाद : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट विंडिजवर ६ गडी आणि ८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

विजयासाठीचे २०८ धावांचे आव्हान भारतीय संघाने १८.४ षटकांत ४ बाद २०९ धावा करत पूर्ण केले. भारताकडून विराटने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह सर्वाधिक नाबाद ९४ धावा केल्या तर लोकेश राहुलने ४० चेडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६२ धावा करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. रोहितने ८, रिषभ पंतने १८, श्रेय्यस अय्यरने ४ धावा केल्या. विंजिजकडून गोलंदाजीत ख्यारी पिएरेने २ तर काॅटरेल आणि पोलार्डने प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारून विंडीजला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. विंडीजची सुरूवात खराब झाली. सलामीवीर लेंडन सिमन्सला दीपक चहरने रोहित शर्माकरवी झेलबाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. सिमन्स ०२ धावांवर बाद झाला. त्यानंतर एविन लुईसने १७ चेंडूतस४०, ब्रँडन किंगने २३ चेडूंत ३१, शिमरन हेटमायरने ४१ चेंडूत ५६, कायरन पोलार्डने १९ चेंडूत ३७ आणि जेसन होल्डरने ९ चेंडूत २४ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकात ५ बाद २०७ पर्यत नेली.

भारतीय संघाचे आज गच्छाळ क्षेत्ररक्षण झाले. भारताच्या विराटने आणि रोहितने प्रत्येकी १ झेल सोडला तर सुंदरने २ झेल सोडले. भारताकडून चहल याने ४ षटकात ३६ धावा देत २ गडी बाद केले. दीपक चहरने ४ षटकात सर्वाधिक ५६ धावा देत १ गडी बाद केला. फिरकीपटू सुंदरने ३ षटकात ३४ धावा देत १ गडी तर जडेजाने ४ षटकात ३० धावा देत १ गडी बाद केला. शिवम दूबेनी १ षटकात १३ धावा दिल्या, त्याला गडी बाद करण्यात अपयश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.