नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळण्यात आले होते. बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी आज त्याच ठिकाणी एन्काऊंटर केला असून, त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या एन्काऊंटर वर आपलं मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत पोलिसांच्या या कृतीचं स्वागत केलं आहे. ‘कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो”. असं म्हणत राज ठाकरेंनी हैदराबाद पोलिसांवर कौतुक केलं आहे.
कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो. #Hyderabad #Encounter #JusticeForDisha
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019