चेन्नई – इंग्लंडच्या पहिल्या डावातील 578 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत भारतीय फलंदाजांची धावाधाव उडाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 6 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारत अजून 321 धावांनी पिछाडीवर असल्याने भारतासमोर फॉलोऑन टाळण्याचे आव्हान आहे. इंग्लंडकडून डॉम बेसने चार गडी बाद केले.
इंग्लंडचा डाव आज फार लांबला नाही. सकाळी खेळायला सुरुवात झाल्यावर जेमतेम 10 षटकांत त्यांचा डाव 578 धावांत म्हणजे आणखी 23 धावांचीच भर घालून संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या डावाची सुरुवातही निराशाजनक ठरली.
इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला फारशी चांगली सलामी मिळाली नाही. अनुभवी जिमी अँडरसनपेक्षा इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने नवा चेंडू चांगला हाताळला. खेळपट्टीवर असलेल्या उसळीचा त्याने चांगला उपयोग करून चेंडू शिताफीने बाहेर काढले. अशाच एका क्षणी रोहित शर्माला बाहेर जाणाऱ्या चेंडूचा पाठलाग करण्याचा मोह आवरला नाही. शुभमन गिल आत्मविश्वासाने खेळत असताना त्याला आक्रमकतेला संयमाची जोड देता आली नाही.
आर्चरच्या या दोन दणक्याने भारत बॅकफूटला गेला. डॉम बेसच्या फिरकी उपयोगही इंग्लंडने त्या वेळी करून बघितला. पण, उपाहारापूर्वी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ही भारतीय जोडी टिकून राहिली. अर्थात, कोहलीच्या खेळात आत्मविश्वास नव्हता. त्याची पायाची हालचाल म्हणावी तशी होत नव्हती. आर्चरनेही त्याला एक-दोनवेळा उजव्या यष्टिबाहेर जाणाऱ्या चेंडूवर चकवले.
दुसऱ्या बाजून बेसने चांगली लय पकडली होती. त्यात खेळपट्टीची त्याला साथ मिळाली. त्याचे ऑफ ब्रेक चांगल्या प्रकारे वळत होते. कोहली त्याला पुढे खेळण्यात चुकला आणि फॉरवर्ड शॉर्टलेगला ऑली पोपने त्याचा झेल टिपला. एका षटकाच्या अंतराने बेसने रहाणेला बाद केले. बेसने राखलेला अचूक टप्पा आणि कव्हरला रुटने डावीकडे झेपावत एका हातात पडकलेल्या झेलने रहाणेची विकेट इंग्लंडला स्वस्तात मिळाली. त्यावेळी भारतीय संघ 4 बाद 73 असा असा अडचणीत आला.
यानंतर पुजाराच्या साथीत खेळायला आलेल्या रिषभ पंतमुळे गमावलेला आत्मविश्वास पुन्हा दिसू लागला. ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटी सामन्यातील नाबाद खेळीच त्याने पुढे सुरू केल्याचे वाटत होते. त्याने आक्रमक फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना स्थिर राहू दिले नाही. विशेषतः त्याने जॅक लिचच्या फिरकीचा यथेच्छ समाचार घेताना त्याला षटकाराच्या मागून षटकार ठोकले.
पंतपासून प्रेरणा घेत पुजारानेही फिरकीचा समाचार घेण्यास सुरवात केली. दोघांनी आपली अर्धशतके चौकारांनी साजरी केली. यामध्ये फरक फक्त सामना केलेल्या चेंडूंचाच होता. पुजाराने आपले अर्धशतक 106, तर पंतने 40 चेंडूंत पूर्ण केले. शतकी भागीदारी करत या जोडीने इंग्लंडला पुन्हा विचार करायला भाग पाडले. अखेरच्या सत्रात त्याने पुन्हा वेगवान गोलंदाज आणले. तेव्हा अँडरसनच्या उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागला. मात्र, तो बेसला आत्मविश्वासाने खेळत होता. पण, आज नशिब बेसच्या बाजूने होते. त्याला फटकावण्याच्या नादात चेंडू शॉर्टलेगवरील ऑली पोपच्या खांद्यावरुन उसळून मिडविकेटला बर्न्सच्या हातात विसावला.
पाठोपाठ शतकाच्या उंबरठ्यावर असताना पंतला पुन्हा एकदा आक्रमकतेला मुरड घालता आली नाही आणि त्याने 9 चौकार, पाच षटकारांची आपली वेगवान खेळी 91 धावांवर संपुष्टात आणली. पुढे दिवस अखेरीस सुंदर-अश्विन यांनी तग धरला. सुंदरचा आर्चरने सोडलेला झेल वगळता इंग्लंडने आपले पाऊल कायम पुढेच ठेवले आहे. दिवसाअखेर वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन यांनी उर्वरित वेळेत सतराहून अधिक षटके खेळून काढत इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दिवसाअखेर सुंदर 33 आणि अश्विन 8 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड पहिला डाव 578 (ज्यो रुट 218, डॉम सिब्ली 87, बेन स्ट्रोक्स 82, ऑली पोप 34, जोस बटलर 30, डॉम बेस 34, जसप्रित बुमरा 3-84,, आर. अश्विन 3-146, शाहबाज नदिम 2-167, ईशांत शर्मा 2-52) भारत 6 बाद 257 (रिषभ पंत 91 (88), चेतेश्वर पुजारा 73, शुभमन गिल 29 (28), वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 33, डॉम बेस 4-55, जोफ्रा आर्चर 2-52)