#INDvAUS Test Series : ऑस्ट्रेलियन संघात पाच नवे चेहरे

विल पुकोव्हस्की, कॅमेरॉन ग्रीन, सीन ऍबट, मिशेल स्वेप्सन आणि मायकेल नासेर

मेलबर्न  – येत्या 17 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम पेनच्या नेतृत्त्वातील ऑस्ट्रेलियन संघात तब्बल पाच नवोदित क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली असून, 17 सदस्यांचा हा नव्या-जुन्या क्रिकेटपटूंचा संघ बलाढ्य समजला जात असलेल्या भारताला तुल्यबळ लढत देईल, असा विश्‍वास निवड समितीने व्यक्त केला आहे. विल पुकोव्हस्की, कॅमेरॉन ग्रीन, सीन ऍबट, मिशेल स्वेप्सन आणि मायकेल नासेर असे हे पाच खेळाडू प्रथमच प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेची “ऑस्ट्रेलियन बॅगी (ग्रीन कॅप) परिधान करतील.

यापैकी विल पुकोव्हस्की सलामीवीर असून कॅमेरॉन ग्रीन अष्टपैलू खेळाडू आहे. तसेच वेगवान गोलंदाज सीन ऍबटही कसोटी पदार्पण करणार आहे. सीन ऍबटचाच चेंडू लागून फिल ह्युजेस या क्रिकेटपटूचा शेफिल्ड शिल्ड सामन्यावेळी मृत्यू झाला होता. तर मिशेल स्वेप्सन लेगब्रेक गोलंदाज असून मायकेल नासेर हाही अष्टपैलू खेळाडू आहे.

या सर्व पाचही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली सातत्याने चमक दाखवल्याने, आम्ही त्यांच्यावर विश्‍वास टाकत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघांना मागील मालिकांमध्ये पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा नवा संघ बलाढ्य भारताला टक्कर देईल, असेही हा प्रवक्ता म्हणाला.

सध्या बॉर्डर-गावसकर चषक भारताकडे असून, भारत हा चषक स्वत:कडेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. मात्र, ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्या आणि पाच नवे खेळाडू यांचा सामना करणे त्यांना तितके सोपे जाणार नाही, असे मानले जात आहे. अशातच पहिला कसोटी सामना दिवस-रात्र असा असून, अशा कसोटींचा ऑस्ट्रेलियाला भारतापेक्षा जास्त अनुभव आहे.

कोविड-19 च्या साथीचा फैलाव सुरु होण्यापूर्वी झालेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमधील जबरदस्त कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटीच्या मानांकनात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

भारताच्या या दौऱ्यात चार कसोटी सामने, त्यातली पहिली कसोटी दिवस-रात्र (गुलाबी चेंडू) दुसरी कसोटी “बॉक्‍सिंग-डे’ कसोटी, त्यानंतर तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका तसेच तीन टी-20 सामन्यांची मालिका असा भरगच्च कार्यक्रम आहे. या मालिकेत टीम पेनला उपकर्णधार पॅट कमिन्सची साथ लाभणार आहे.

विल पुकोव्सकीने शेफिल्ड शिल्डच्या दोन सामन्यांत सलग दोन द्विशतके झळकावत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याच्यासमवेत डेव्हिड वॉर्नर हा अनुभवी सलामीवीर आहेच. तसेच ज्यो बर्न्स हा मधल्या फळीतला फलंदाज आपल्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. कसोटी संघ निवडतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या सराव सामन्यांसाठी 19 सदस्यांच्या ऑस्ट्रेलिया- अ संघाचीही घोषणा केली आहे.

असे आहेत  कसोटी सामने…

1. पहिला कसोटी सामना 17 ते 21 डिसेंबर ऍडलेड (दिवस-रात्र)
2. दुसरा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर मेलबर्न
3. तिसरा कसोटी सामना 7 ते 11 जानेवारी सिडनी
4. चौथा कसोटी सामना 15 ते 21 जानेवारी गॅबा

ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल – मायकेल वॉन

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला सहज मात देईल असं ट्‌विट केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी विराट नसणार. पहिल्यांदाच बाबा होणाऱ्या विराटचा पालकत्व रजा घेण्याचा निर्णय अगदी अचूक आहे, पण याचाच अर्थ (विराट नसल्यामुळे) ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका अगदी सहज जिंकेल, असं ट्‌विट वॉनने केलं आहे.

असा आहे ऑस्ट्रेलियन संघ – 

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर.

असा आहे ऑस्ट्रेलिया “अ’ संघ –

सीन अबॉट, श्‍टन अगर, जो बर्न्स, जॅक्‍सन बर्ड, ऍक्‍स कॅरी (यष्टिरक्षक), हॅरी कॉन्वे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, मोइसेस हेनरिक्‍स, निक मॅडिनसन, मिशेल मार्श, मायकेल नेसर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, मार्क स्टेकी, विल सुदरलॅंड, मिशेल स्वॅपसन

असा आहे भारताचा संघ- 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्‍विन, मोहम्मद सिराज

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.