#INDvAUS : भारताचा आॅस्ट्रेलियावर विजय; मालिकाही खिशात

बेंगळुरू : सलामीवीर रोहित शर्माच्या शानदार शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या तिस-या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ७ गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. यासह विजयासह भारताने तीन सामन्याची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे. रोहित शर्मा सामनावीर तर विराट कोहली मालिकावीर ठरला.

विजयासाठीचे २८७ धावांचे आव्हान भारताने ४७.३ षटकांत ३ बाद २८९ धावा करत पूर्ण केले. दुखापतग्रस्त शिखर धवनच्या अनुपस्थित सलामीस आलेल्या लोकेश राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी १२.३ षटकांत ६९ धावांची भागिदारी केली. राहुलला १९ धावांवर पायचित करून एश्टन एगरने भारतास पहिला धक्का दिला. त्यानंतर कोहली आणि रोहितने संघाची धूरा हाती घेत दुस-या विकेटसाठी १३७ धावांची भागिदारी करत ३६.४ षटकांत संघाची धावसंख्या २०६ वर नेली. रोहित शर्माला एडम जम्पाने स्टार्ककरवी झेलबाद करत ही जोडी फोडली.

रोहितने १२८ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली. त्याआधी त्याने कारकिर्दीतील २९ वे शतक साजरं केले. तसेच सुरूवातीला ४ धावा काढत रोहित शर्माने ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

त्यानंतर ४५.५ षटकांत संघाची धावसंख्या २७४ असताना हेझलवूडने कोहलीला त्रिफळाचित करत भारताला तिसरा धक्का दिला. विराटने ९१ चेंडूत ८ चौकारासह ८९ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने ३५ चेंडूत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ आणि मनीष पांडेने ४ चेंडूत २ चौकारासह नाबाद ८ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या ४६ असताना आॅस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले होते. डेव्हिड वाॅर्नर ३ तर अॅरन फिंच १९ धावांवर बाद झाले. त्यानंतर स्टीव स्मिथ आणि मार्नस लबूशेनने डाव सावरत तिस-या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १७३ पर्यत नेली. लबुशेनला ५४ वर कोहलीकरवी झेलबाद करत जडेजाने ही जोडी फोडली. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर स्टार्कला जडेजाने झेलबाद करत आॅस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.

त्यानंतर स्मिथने एलेक्स कैरी सोबत पाचव्या विकेटसाठी ५८ धावा जोडत संघाची धावसंख्या २३१ पर्यंत नेली. एलेक्स कैरी ३५ धावावर बाद झाला. त्यानंतर ४७.१ षटकांत संघाची धावसंख्या २७३ असताना स्मिथला मोहमद शम्मीने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत सातवा धक्का दिला. त्यानंतर कमिन्स ० आणि एडम जम्पा १ वर बाद झाला. त्यानंतर एश्टन एगरने नाबाद ११ धावा करत आॅस्ट्रेलियास ५० षटकांत ९ बाद २८६ पर्यंत मजल मारून दिली.

भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने १० षटकांत ६३ धावा देत सर्वाधिक ४ गडी तर रविंद्र जडेजाने १० षटकांत ४४ धावा देत २ गडी बाद केले. नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here