जकार्ता – इंडोनेशियातील देशांतर्गत प्रवासासाठी जकार्ता विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर श्रीविजया एअर पॅसेंजर कंपनीचे विमान थोड्याच वेळात बेपत्ता झाले आहे. हवाई वाहतुक नियंत्रण कक्षाशी या विमानाचा संपर्क तुटला आहे.
बोईंग 737-500 या विमानाने रात्री 1:56 वाजता जकार्ताहून उड्डाण केले आणि पहाटे 2:40 वाजता या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले.
हे विमान जकार्ता ते इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावरील पश्चिम कालिमंतन प्रांताची राजधानी पोंटियानॅककडे जाण्यासाठी निघाले होते. हा प्रवास अंदाजे 90 मिनिटांचा होता, असे एअरलाइन्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या विमानामध्ये 56 प्रवासी आणि 6 असे एकूण 62 जण होते. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्था आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समिती यांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य चालू आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
जकार्ताच्या उत्तरेकडील बेटांच्या शृंखलेतील थाउजंड आयलॅन्डवर विमानाचे अवशेष वाटावेत, अशा वस्तू विखुरलेल्या पाहिल्या असल्याचे या भागातील मच्छिमारांनी म्हटले आहे. विमान बेपत्ता झाल्याची बातमी पसरताच या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी जकार्ता आणि पोन्टियानाक्स विमानतळावर गर्दी केली आणि विमान वाहतुकीच्या नियंत्रण कक्षाकडून अधिक माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना गराडा घातला.
अनेक बेटांचा समूह असलेल्या इंडोनेशियाची लोकसंख्या 26 कोटी आहे. रस्ते, हवाई मार्ग आणि सागरी प्रवासी मार्गावर असलेला अतिरिक्त ताण आणि तुलनेने कमी पायाभूत सुविधा यामुळे इंडोनेशियातील हवाई आणि सागरी प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक असते.
ऑक्टोबर 2018 मध्ये जावा बेटावर जाण्यासाठी जकार्तावरून उड्डाण केलेल्या लायन एअर कंपनीचे विमान थोड्याच अवधीमध्ये कोसळले होते. या विमान अपघातात विमानातील 189 प्रवासी ठार झाले होते. 1997 पासूनचा इंडोनेशियातील हा सर्वात भीषण विमान अपघात होता. 1997 मध्ये गरुड एअरवेजचे विमान सुमात्रा बेटावरील मेदानजवळ कोसळून 234 लोक ठार झाले होते. तर डिसेंबर 2014 मध्ये, सूरबायाहून सिंगापूरला जाणारे एअर एशिया कंपनीचे विमान समुद्रात कोसळले होते. त्या अपघातात 122 लोक ठार झाले होते.
श्रीविजया एअर ही इंडोनेशियातील सर्वात स्वस्त दर असलेली विमान कंपनी आहे. इंडोनेशियात देशांतर्गत आणि परदेशातही या विमान कंपनीच्या डझनभर सेवा सुरू असतात.