इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग : मुंबईचे राजेंना पराभवाचा धक्का

पुणे – दोन क्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करून देखील मुंबई चे राजे संघाला इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बालेवाडी येथे पार पडलेल्या सामन्यात तेलुगु बुल्स संघाकडून 39-28 असे पराभूत व्हावे लागले.

मुंबईच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या दिलजीतने सलग गुण मिळवत पहिल्या क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच 6-2 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर तेलुगु बुल्स संघाने गुणांची कमाई करत मुंबई चे राजे संघाची आघाडी कमी केली व पहिल्या क्वॉर्टरअखेरीस 8-7 अशी आघाडी घेतली.

मुंबईच्या संघाने आपला बचाव आणखीन भक्कम केला व मुंबई चे राजे संघाने पाच मिनिटे शिल्लक असताना 12-8 अशी आघाडी घेतली. पण, बचावात झालेल्या चुकीचा फटका मुंबईला बसला त्यामुळे तेलुगु बुल्स संघाने तीन गुण मिळवत आघाडी 11-12 अशी कमी केली. यानंतर मुंबईच्या चढाईपटूंनी गुण मिळवत दुसऱ्या क्वार्टर अखेरीस 17-14 अशी आघाडी घेतली.

तेलुगू बुल्स संघाने चलाखीने मुंबई चे चढाईपटू बाद करत पहिल्यादा मुंबईला सर्वबाद केले आणि तिसऱ्या क्वॉर्टरला पाच मिनिटे शिल्लक असताना 22-18 अशी आघाडी घेतली.यानंतर तेलुगू बुल्स संघाने आपला हा फॉर्म कायम ठेवत तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 27-21 अशी आघाडी घेतली.अंतिम क्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाला तेलुगु बुल्स संघाने कोणतीही संधी दिली नाही.11 गुणांची कमाई करत चौथ्या क्वार्टरअखेरीस तेलुगू बुल्सने 39-28 असा विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.