नवी दिल्ली – भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची क्रेझ वाढताना दिसत आहे. दिवाळीच्या काळात देशांतर्गत विमान कंपन्यांचा हवाई प्रवास खर्चीक बनला असताना देखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांचा कल वाढला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास (Air Travel) करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत सुमारे 1.26 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. आकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइन्स अजूनही या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.
तसेच या कालावधीत एअर इंडियाचा बाजार (India bazar) हिस्सा 10.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विस्तारा आणि एअर एशियाच्या बाजारपेठेत मात्र घसरण झाली आहे. स्पाईसजेट आणि आकासा एअरही त्यांच्या जागी ठाम आहेत. “डीजीसीए’नुसार, 79 लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा (Indigo Airlines) वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 63.4 टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे 11 टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे 1.22 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.
गेल्या महिन्यात, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया यांना बाजारातील शेअरमध्ये थोडासा तोटा झाला आहे. आता विस्ताराचा बाजार हिस्सा 9.7 टक्के आणि एअर एशियाचा 6.6 टक्के आहे. स्पाइस जेटचा बाजारातील हिस्सा 4.4 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे. याशिवाय आकाशाने अजूनही 4.2 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.
587 प्रवाशांना जागा मिळाली नाही
“डीजीसीए’च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे 587 प्रवाशांना विमानात जागा देण्यात आली नाही. तसेच, उड्डाण रद्द झाल्याने 30,307 प्रवाशांना त्रास झाला. गेल्या महिन्यात 1.78 लाखांहून अधिक प्रवाशांना उशीर झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता.