सातारा – माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिकेतील सभापती निवडीसंदर्भात गुरुवारी पुण्यात घेतलेल्या बैठकीत पाणीपुरवठा, बांधकाम व आरोग्य सभापतीपदांच्या बदलावर चर्चा झाल्याने खांदेपालट निश्चित झाली आहे. सातारा पालिकेची सभापती निवडीची शनिवारी विशेष सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी त्यांचे खास कॅबिनेट चर्चेसाठी कल्याणीनगर (पुणे) येथे बोलावले होते. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर आदी यावेळी उपस्थित होते. सभापती निवडीच्या निमित्ताने इच्छुकांच्या नावाची चर्चा झाली.
मात्र, ती जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवण्यात आली. ज्या समित्यांची कामे व बैठका सुरळीत होत नाहीत, त्यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने उदयनराजे यांनी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून तब्बल साडेपाच तास मॅरेथॉन बैठक घेतल्याची माहिती मिळाली. पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना सभापती म्हणून तब्बल अठरा महिने कामाची संधी मिळाली. त्यामुळे तेथे बदल अपेक्षित आहे.
बांधकाम व आरोग्य या खात्यांचे कारभारी बदलण्याचे संकेत आहेत. संभाव्य नूतन सभापतिपदांसाठी अनिता अशोक घोरपडे, यशोधन नारकर ही नावे चर्चेत पुढे आली. करंजे भागातील उदयनराजे समर्थक कै. सतीश पवार यांच्या पत्नी लता पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा पालिकेत वीस महिन्यांचा कार्यकाल शिल्लक आहे. नियोजन सभापती, व उपनगराध्यक्ष पद वगळता इतर पदांचे बदल होणार असल्याने पुन्हा संधी कोणाला, ही उत्सुकता आहे. स्थायी समिती रचना व निमंत्रित, विषय समिती सदस्यांची नावे शनिवारी सभेपूर्वी उदयनराजे यांच्याकडून कळवली जाणार आहेत.