दमास्कस – “ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत मदत साहित्याचे सातवे विमान भारतातून रवाना झालेले हे विमान आज सीरियात दाखल झाले आहे. या मदत साहित्यामध्ये 23 टन साहित्याचा समावेश आहे. या मदत साहित्यातील 23 टन मदत साहित्य सीरियासाठी आणि 12 टन साहित्य तुर्कीयेसाठी आहे.
हे मदत साहित्य दमास्कस विमानतळावर सीरियातील स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण खात्याचे उपमंत्री मौताझ दौआंजी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. “ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत उत्तर प्रदेशातील हिंडेन हवाई तळावरून हे मदत साहित्य घेतलेले हवाई दलाचे सी-17 विमान तुर्कीये आणि सीरियाला रवाना करण्यात आले होते. दमास्कस विमानतळावरूनच तुर्कीयेसाठीचे मदत साहित्य तुर्कीयेत भारतीय लष्कराने उभारलेल्या फिल्ड हॉस्पिटलसाठी रवाना करण्यात आले.
या मदत साहित्यामध्ये जेनसेट, सोलर दिवे, इमर्जन्सी आणि गंभीर रुग्णावरील उपचारांसाठीची औषधे, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे अत्यावश्यक साहित्याचा समावेश आहे, असे सीरियाच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.