नवी दिल्ली – देशातील खेळणी उत्पादकांनी खेळण्याच्या निर्यातीत बऱ्यापैकी कामगिरी नोंदवली आहे. सन २०२१ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सन २०२३ च्या आर्थिक वर्षात खेळण्यांच्या निर्यातीत २७ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे.
ही निर्यात आता ३२५.७३ दशलक्ष डॉलर्स इतकी झाली आहे. खेळण्यांचा एकूण जागतिक बाजार हा तब्बल १२० अब्ज डॉलर्सचा असून त्यात भारताचा वाटा मात्र केवळ १ ते २ टक्के इतकाच आहे. खेळणी व्यवसायात चीनचा वाटा मात्र तब्बल सुमारे ६० टक्के इतका आहे.
चीन दरवर्षी ६६ ते ६७ अब्ज डॉलर्सची खेळणी निर्यात करतो. त्यांतर व्हिएतनाम हा खेळणी निर्यात करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताचे खेळणी निर्यातीतील स्थान पहिल्या १५ देशांमध्येही नाही.
आज चीनचे खेळणी मार्केट हे भारताच्या तब्बल १८ पट मोठे असले तरी या क्षेत्रातील भारतीय उत्पादकांनी आता हळहळू खेळणी निर्यातीकडेही लक्ष द्यायला सुरूवात केली आहेे.