Stock Market Updates: भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार हा दिवस अशुभ ठरला आहे. बँकिंग, मिडकॅप आणि सरकारी कंपन्यांच्या समभागांमध्ये नफा बुकिंगमुळे बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आजच्या सत्रात स्मॉल कॅप समभागांना चांगलाच फटका बसला आहे. बाजार बंद झाल्यानंतर BSE सेन्सेक्स 1053 अंकांनी घसरून 70,370 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 333 अंकांनी घसरून 21,238 अंकांवर बंद झाला. बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.
आजच्या व्यवहारात बँकिंग समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली. बँक निफ्टी 2.26 टक्क्यांनी किंवा 1043 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी घसरण झाली. केवळ हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागही मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 5 समभाग हिरव्या तर 25 समभाग लाल रंगात बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 10 वाढीसह आणि 40 तोट्यासह बंद झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. रुपया 8 पैशांनी कमजोर झाला आणि एका डॉलरच्या तुलनेत 83.15 रुपयांवर बंद झाला.
मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटींची घट –
शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे बाजार भांडवल 366.04 लाख कोटी रुपये झाले जे मागील सत्रात 374.38 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 8.34 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आजच्या व्यवहारात सन फार्मा 4.05 टक्के, भारती एअरटेल 3.37 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.10 टक्के, पॉवर ग्रिड 0.27 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.13 टक्के वाढीसह बंद झाले. तर IndusInd बँक 5.87 टक्के, SBI 4.19 टक्के, HUL 3.81 टक्के, HDFC बँक 3.45 टक्क्यांनी घसरून बंद झाले.