Share Market Update: या आठवड्यात भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. बुधवारप्रमाणे गुरुवारीही बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 830 अंकांनी तर निफ्टी 290 अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या समभागातील नफा बुकिंगमुळे बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली.
आज बाजारात सकाळच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण झाली, त्यानंतर मिड कॅप निर्देशांक 1300 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक 400 हून अधिक अंकांनी घसरला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 314 अंकांच्या घसरणीसह 71,187 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 21,462 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, इन्फ्रा हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. तर बँकिंग, आयटी, वित्तीय सेवा, एफएमसीजी, धातू, मीडिया, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. सकाळी मोठी घसरण पाहिल्यानंतर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 12 समभाग वाढीसह आणि 18 घसरणीसह बंद झाले. तर 50 निफ्टी समभागांपैकी 22 वाढीसह आणि 28 घसरणीसह बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये घसरण –
आज बाजार बंद होतेवेळी बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 67,000 कोटी रुपयांनी घसरले आणि 369.75 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 372.42 लाख कोटी रुपये होते.