भारतीय क्रिकेट संघाचा ‘टर्बनेटर’ अर्थात फिरकीपटू हरभजन सिंहने आज आपण दुसऱ्यांदा ‘बाबा’ झाल्याचे जाहीर केले. हरभजनने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतची माहिती दिली असून गीता व हरभजन या जोडप्याने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय.
हरभजन व गीता हे २०१६ मध्ये पहिल्यांदा आई-बाबा झाले होते. त्यांना प्रथम कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. जोडप्याने आपल्या मुलीचं नाव हिनाया ठेवलं आहे.
दरम्यान, हरभजनने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दुसऱ्यांदा ‘बाबा’ झाल्याचे जाहीर करतानाच, ‘बाळ सुदृढ असून पत्नी गीताची प्रकृतीही ठणठणीत’ असल्याचं सांगितलं. तसेच त्याने विधात्याचे आभारही मानले.
हरभजनने ही गोड बातमी दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजन सिंह हा भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट ऑफस्पिनर असून त्याच्या फिरकीपुढे मोठं-मोठ्या फलंदाजांची धांदल उडते.
२००१मध्ये ईडन गार्डन येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये हरभजनने सलग तीन बळी घेत ‘हॅटट्रिक’ नोंदवली होती. तेव्हा हरभजन केवळ २० वर्षांचा होता.