एक दिवसीय सामन्यांना आज प्रारंभ
भारत विरूध्द वेस्टइंडिज
स्थळ- प्रोव्हिडन्स, गयाना
वेळ-सायंकाळी 7 वा. (भारतीय वेळेनुसार)
गयाना – टी-20 च्या तीनही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजला नमविणारा भारतीय संघ एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतही वर्चस्व टिकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज येथे होणार आहे.
विंडीजविरूद्ध टी-20 मधील विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. कोहली व रोहित शर्माबरोबरच शिखर धवन हा एक दिवसीय सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाज मानला जातो. आज त्याच्याकडून चमकदार खेळाची आशा आहे. मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. विश्वचषक स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयशामुळेच पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आज हे फलंदाज कशी कामगिरी करतात याची उत्कंठा आहे. पंतने टी-20 च्या तिसऱ्या सामन्यात संघास विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या समावेशामुळे बाजू बळकट झाली आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक केली होती. त्याच्याबरोबरच भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी यांच्यावरही मदार आहे.
टी-20 मधील पराभवाची परतफेड करण्यासाठी वेस्ट इंडिज संघ जिद्दीने खेळ करील असा अंदाज आहे. झंझावती खेळाबाबत ख्यातनाम असलेल्या ख्रिस गेलच्या सहभागामुळे त्यांच्या फलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. शाय होप, शिमोरन हेटमेयर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियन ऍलन यांच्यावरही फलंदाजीची मोठी जबाबदारी राहणार आहे. गोलंदाजीत शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस व कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडून चांगल्या यशाची अपेक्षा आहे.
प्रतिस्पर्धी संघ – भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज -जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमोरन हेटमेयर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस, केमार रोच.