क्रीडारंग : आता स्वारी ऑस्ट्रेलियाची

-अमित डोंगरे

करोनाचा धोका असतानाही आयपीएल स्पर्धा अमिरातीत अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित झाली. या स्पर्धेत भारतीय संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटूंनी सरस खेळ केला. त्यात विराट कोहलीसह अन्य काही खेळाडू अपयशी ठरले असले तरीही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असलेल्या मालिकेचे गांभीर्य निराळे असते व तिथे कोहलीच किंग ठरेल यात शंका नाही. त्यामुळे गेल्या दौऱ्यात भारतीय संघाने जसे यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करत स्वप्नवत कामगिरी केली होती, त्याची पुनरावृत्ती यंदा होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही दशकांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला “पर्यटक’ असे हिणवले जात होते. अर्थात, त्याला कारणही तसेच होते. एकदा भारतीय संघ उन्हाळ्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. संघाने सर्व कसोटीत पराभव स्वीकारला होता. त्यावेळी भारतात परतत असताना हिथ्रो विमानतळावरील एका क्रिकेटप्रेमी अधिकारी व्यक्‍तीने भारतीय संघाच्या तत्कालीन कर्णधाराला सुनावले होते. तुम्ही आमचा “समर’ वाया घालवला. तुमच्या जागी ऑस्ट्रेलिया किंवा वेस्ट इंडिजला बोलावले असते तर खरे क्रिकेट पाहायला मिळाले असते. असे ताशेरे आपण वर्षानुवर्षे ऐकत होतो. अर्थात, परिस्थिती काही बदलत नव्हती. संघातील विक्रमादित्य सुनील गावसकर धावा करत होते व कपिलदेव बळी मिळवत होते, बाकी सगळा आनंदीआनंदच होता.

1983 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतरच्या 1985 च्या बेन्सन ऍण्ड हेजेस मालिकेतही भारतीय संघाने प्रत्येक संघावर वर्चस्व राखताना विजेतेपद मिळाले. याच मालिकेत अष्टपैलू रवी शास्त्री प्रसिद्ध ऑडी कार घेऊन भारतात परतले. तेव्हापासून भारतीय संघाने कोणत्याही देशाचा “समर’ वाया घालवला नाही.

असो, हा इतिहास अशासाठी सांगितला की, पार्श्‍वभूमी माहीत असणे महत्त्वाचे असते. गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हाही असेच वाटत होते की, यजमान संघ वर्चस्व राखेल. मात्र, चित्र निराळेच दिसले. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने आपला दबदबा प्रस्थापित केला. त्यावेळच्या संघात जे खेळाडू होते, त्यातील जवळपास 80 टक्‍के खेळाडू या मालिकेतही दिसणार आहेत. एक मोठा फरक या कालावधीत झाला तो म्हणजे भारताची वेगवान गोलंदाजी. जसप्रीत बुमराह व महंमद शमी जास्त अनुभवी बनले आहेत. त्यांचे यॉर्कर, स्विंग तसेच उसळणारे चेंडू जास्त घातक बनले आहेत. बुमराहने वसीम अक्रमचा वारसा घेतल्याप्रमाणे यॉर्करवर हुकूमत सिद्ध केली आहे.

नव्या जमान्यातील क्रिकेटमध्ये आता त्याचा उल्लेख “सुलतान ऑफ स्विंग’ असा होतो. त्याने गेल्या दोन ते तीन मोसमांत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जगातील बहुतेक सर्व मोठ्या फलंदाजांना तालावर नाचवले आहे. त्याच्या जोडीला अत्यंत मेहनती शमी देखील तितक्‍याच भरात आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत शमीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला अपयशाचा सामना करावा लागला असला, तरीही त्याच्या गोलंदाजीने यशाचे इमले रचले आहेत. या मालिकेत बुमराहसह शमी देखील आपले सक्‍सेस कार्ड राहणार आहे.

रोहितच्या निवडीवरून कवित्व

रोहित शर्माला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यावरून खूप मोठा वाद घडला होता. एकीकडे मयंक अग्रवाललाही दुखापत झाली असताना त्याची संघात निवड झाली मात्र, ते रोहितच्या बाबतीत घडले नाही. त्यामुळे रोहितबाबत कोणी राजकारण केले का, असाही प्रश्‍न विचारला जात होता. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात रोहित सहभागी झाला होता व त्याने आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर बीसीसीआयवरही ताशेरे ओढले गेले. अखेर त्यावरून सुरू झालेले कवित्व संपले व कसोटी मालिकेसाठी रोहितची भारतीय संघात निवड झाली व या वादाला पूर्णविराम मिळाला.

करोनानंतरचा भारताचा पहिलाच दौरा 

मार्चपासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने सर्व क्रिकेट ठप्प झाले होते. त्यानंतर जवळपास सात महिन्यांनंतर भारतीय संघ पहिलाच इतका मोठा दौरा करत आहे. तसे पाहायला गेले तर इंग्लंडमध्ये करोनाचा धोका कमी झाल्यावर पाकिस्तान, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्या मालिका झाल्या. मात्र, भारतीय संघाचा करोना काळानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने त्याला भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे.

कसोटी अजिंक्‍यपदातील स्थान कायम राहावे

गेल्या वर्षीपासून आयसीसीने कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा सुरू केली आहे. त्यात भारतीय संघाने सातत्याने वर्चस्व राखताना पहिले स्थानही पटकावले आहे. त्यामुळे ही मालिकाही जिंकून आपले जागतिक वर्चस्व सिद्ध करण्याची भारतीय संघाला संधी आहे.

भारत सर्वच क्षेत्रात सरस

भारतीय संघ पाहिला तर एकदिवसीय, टी-20 तसेच कसोटी मालिकेसाठी यजमान ऑस्ट्रेलियापेक्षाही जास्त सरस वाटतो. आता प्रत्यक्ष मैदानात कशी कामगिरी होते ते महत्त्वाचे आहे. संघ या काळात तेथे जात असल्याने थंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्विंग गोलंदाजीचा सामना भारताचे दिग्गज फलंदाज कसे करणार यावरच या मालिकेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, गेल्या मालिकेत भारतीय संघाने ज्या पद्धतीने वर्चस्व राखले ते पाहता संघाला त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी निश्‍चितच आहे.

वॉर्नर-स्मिथमुळे फरक पडेल

या कसोटी मालिकेत यंदा स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरही खेळणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची बाजू आणखी मजबूत झाली आहे. गेल्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. या दोघांनी चेंडूशी छेडछाड केल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. या मालिकेत ते संघात असल्याने निकालात फरक पडेल, असे वाटत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.