fbpx

लहान मुलाच्या आतड्याचे प्रत्यारोपण; पुण्यात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे – ओटीपोटात दुखत असल्याने वैद्यकीय तपासणी केली असता, नऊ वर्षीय मुलाच्या आतड्यात “थ्रोम्बोसिस’ तसेच गॅंगरीन झाल्याचे निदान झाले. अखेर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आतडे निष्क्रिय झाल्यामुळे तात्काळ शस्त्रक्रिया करून आतडे काढण्यात आले. त्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याअधी मुलासह त्याच्या वडिलांना करोनाचा संसर्ग झाला. करोनामुक्त झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी 200 सेमी लांबीचे आतडे दान केल्यानंतर हे प्रत्यारोपण केले. देशातील लहान मुलांचे पहिले आतड्याचे दुर्मिळ प्रत्यारोपण पुण्यात यशस्वी झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

 

पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. मोठ्या प्रमाणात आतड्यांना गॅंगरीन होणे हे दुर्मिळ मानले जाते. अशा प्रकारची घटना इटलीमध्ये घडली असून तिचा परिणाम गंभीर झाला.

 

त्यामुळे आतड्यातील गॅंगरीनसह ओटीपोटात संसर्ग झाल्याने हा आजार गुंतागुंतीचा होता. संपूर्ण आतडे गमावल्यामुळे मुलाला काही खाता येत नव्हते. त्याला कृत्रिम पोषक घटकांवर ठेवण्यात आले होते. यालाच “पॅरेंटल न्युट्रिशन’ असेही म्हणतात. मुलाच्या शरिरातील द्रव पदार्थ कमी झाल्याने त्याची प्रकृती अशक्त होती,’ असे रुग्णालयाचे संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सोमण म्हणाले.

 

अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबाल म्हणाले, “या मुलासाठी लहान आतड्याचा एक छोटासा भाग प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी तीन महिने वाट पाहिली. त्याला खाण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी कुटुंबियांसोबत चर्चा केली. वडिलांनी आतड्याचा एक भाग देण्याचा निर्णय घेतला. आठ तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.