हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी

पावसाचे 8 बळी ः राष्ट्रीय महामार्गही ठप्प

शिमला  – महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 8 नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच राज्यातील नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हिमाचलमध्ये अनेक भागात दरड कोसळणे, ढगफुटीसारखे प्रकार घडले आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे 323 रस्ते आणि राष्ट्रीय महार्माग क्र. 5 बंद करण्यात आला आहे. शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जण ठार, तर अन्य एक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. अन्य एका दुर्घटनेत पावसामुळे घराची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. शहा आलम असे त्याचे नाव असून तो मुळचा बिहार राज्यातील आहे.

कुल्लू जिल्ह्यात रोहरू येथे भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. नरकंद गावात एक झाड कोसळून दोन नेपाळी नागरिक, तर चंबा येथे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेश वगळता उत्तराखंड आणि राजस्थानातही अनेक भागांमध्ये पूरस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×