स्टार्टअप्मध्ये भारत जगात चौथा क्रमांकावर
मुंबई – माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या भारतातील स्टार्ट अप्ची संख्या वेगाने वाढत आहे. भारतातील युनिकॉर्नची म्हणजे ज्या स्टार्टअप्चे भांडवली मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे, अशा स्टार्टअप्ची संख्या 21 झाली आहे. यात भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मोठे उद्योग विकसित होण्यासाठी स्टार्टअप्ची संख्या वाढणे गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने स्टार्टअप् संस्कृतीला चालना दिली आहे. त्याची फलनिष्पत्ती दिसू लागली आहे.विशेष म्हणजे भारतात 21 युनिकॉर्न आहेत, त्याचबरोबर भारतीयांनी परदेशात स्थापन केलेले आणखी 40 युनिकॉर्न आहेत. भारतात कार्यरत असलेल्या 21 युनिकॉर्नचे भांडवली मूल्य तब्बल 70.2 अब्ज डॉलर इतके आहे. एक अब्ज डॉलर म्हणजे साधारणपणे 7,500 कोटी रुपये असतात.
स्टार्टअप्च्या संख्येत अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या, ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्या भारतीयांनी परदेशामध्ये 40 स्टार्टअप सुरू केलेले आहेत, त्यांचे भांडवली मूल्य 100 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे स्टार्टअप् कार्यरत आहेत, त्यामध्ये भारतीयांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्चा वाटा मोठा आहे. भारतातील बंगळुरू शहरांमध्ये 8 स्टार्टअप् आहेत.