जकार्ता – भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी सुपर-4 टप्प्यातील सलामीच्या सामन्यात जपानवर 2-1 असा विजय मिळविला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील पराभवाची परतफेड केली. आता सुपर-4च्या टप्प्यातील भारताचा दुसरा सामना रविवारी मलेशियाशी होणार आहे.
भारताकडून मनजीतने 8व्या मिनिटाला, तर पवन राजभरने 35व्या मिनिटाला मैदानी गोल करत विजय मिळवून दिला. तर जपानकडून एकमेव गोल ताकुमा निवाने 18व्या मिनिटाला नोंदविला. सुपर-4च्या सलामीच्या लढतीत जपानने आक्रमक सुरुवात करत भारतावर दबाव आणला. परंतु जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला.
मनजीतने भारताला 8व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. पवन राजभरकडून पास मिळाल्यानंतर त्याने डाव्या बाजूने एक शानदार गोल नोंदविला. पहिल्या क्वार्टरप्रमाणेच जपानी खेळाडूंनी आश्वासक सुरुवात करत 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. या पेनल्टी कॉर्नरवर ताकुमा निवाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली.
जपानने सातत्याने आक्रमण करत भारतीय बचावफळीवर दबाव टाकत आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु भारतीय बचावफळीने ते यशस्वीपणे रोखले. यानंतर राजभरने उत्तरार्धात पाच मिनिटांतच उत्तम सिंगच्या शानदार पासवर गोल करत भारताला विजयी आघाडी बहाल करून दिली.
भारताने पाच मिनिटांनंतर आणखी एक पेनल्टी कॉर्नर स्वीकारला, पण जपानी खेळाडू या संधीचे सोने करण्यात अपयशी ठरले. एका गोलने पिछाडीवर असल्याने जपानी खेळाडूंनी अनेक हल्ले करत दबाव वाढवला, परंतु बीरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखाली सर्व हल्ले परतावून लावत आघाडी अबाधित ठेवली.