इटानगर: चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे. या पूलाची क्षमता 40 टनापर्यंत भार पेलण्याची आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.
या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमीच आपला दावा सांगत आला आहे. आता या पूलावरुन भारत-चीन संबंध आणखी बिघडू शकतात. भारताने आपले रणनितीक हित लक्षात घेऊनच या पूलाची उभारणी केली आहे. 2017 साली डोकलामवरुन भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते. त्याच भागामध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.