भुवनेश्वर – स्टार स्ट्रायकर मनदीप सिंग याने अखेरच्या मिनिटात केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने एफआयएचप्रो-लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनावर 4-3 अशी मात केली.
या दोन संघांमध्ये शनिवारी झालेल्या लढतीत भारताला शूटआउटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड भारतीय संघाने केली. या सामन्यात भारताच्या जुगराज सिंगने 20 व 52 व्या मिनिटांना, तर हार्दिक सिंग याने 17 व्या मिनिटाला एक गोल केला.
मनदीपने सामना संपण्यापूर्वी केवळ 26 सेकंद बाकी असताना निर्णायक गोल मारला. अर्जेंटिनाकडून डेला टोरे निकोलसने 40 व्या, तर डोमेन टॉमसने 51 व्या व मार्टिनने 56 व्या मिनिटांना गोल केले. या विजयानंतर गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यांचे आठ सामन्यांनंतर 16 गुण आहेत. अर्जेंटिना चौथ्या स्थानी कायम असून, त्यांचे सहा सामन्यांत 11 गुण आहेत.