कांगारूंच्या देशात : भ्रमनिरास

-अमित डोंगरे 

करोनाच्या धोक्‍यातही शुक्रवारपासून सुरू झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शुभारंभ झाला. भरात असलेले भारतीय खेळाडू यजमान संघाला चारीमुंड्या चीत करतील अशी असलेली अपेक्षा मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात धुळीला मिळाली. हा सामना भारतीय गोलंदाजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे फलंदाज असा रंगणार असे वाटले होते. 

प्रत्यक्षात भारताच्या सो-कॉल्ड भेदक गोलंदाजीची पिसे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी काढली. खरेतर पिसे काढली असे म्हणण्यापेक्षा भारताच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले असे म्हटले पाहिजे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने चाहत्यांचा भ्रमनिरास केला असेच म्हणावे लागत आहे. 

यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह, स्विंगचा सुलतान महंमद शमी, नवोदित गुणवत्ता असलेला नवदीप सैनी यांच्या गोलंदाजीला एखाद्या क्‍लब दर्जाच्या गोलंदाजीप्रमाणे फटकावत ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार ऍरन फिंच, स्चिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्‍सवेल यांनी धावांचा डोंगर उभारून दिला. धावा जेव्हा साडेतीनशेच्या पुढे गेल्या त्याचवेळी भारताचा पराभवही निश्‍चित झाला होता.

भारताचे महागडे ठरलेले गोलंदाज 

यजुवेंद्र चहल – 10 षटकात 89 धावा
नवदीप सैनी – 10 षटकात 83 धावा
जसप्रीत बुमराह – 10 षटकात 72 धावा
रवींद्र जडेजा – 10 षटकात 63 धावा
महंमद शमी – 10 षटकात 59 धावा

फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल व रवींद्र जडेजा यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केलेला हल्ला इतका भिषण होता की या दोघांना चेंडू कुठे टाकायचा हेच समजत नव्हते. त्यातच या सर्वच गोलंदाजांनी अत्यंत दीशाहिन गोलंदाजी करत अवांतर 21 धावांची खिरापतही वाटली. फिंच व मॅक्‍सवेल यांना नुकत्याच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत अपयश आले होते. त्याची पुरेपूर भरपाई करत त्यांनी वादळी फलंदाजी केली. फिंचने मोसमातील पहिलेच शतक साकार केले.

मॅक्‍सवेलने स्मिथच्या साथीत भारताच्या सर्व गोलंदाजाची प्रचंड धुलाई केली. त्यानंतर स्मिथनेही आक्रमकता कायम राखताना इनसाईट आऊट पद्धतीने बुमराह व शमीच्या गोलंदाजीवर कमालीचे वर्चस्व राखले. त्यानेही मोसमातील पहिलेच शतक फटकावताना यंदाच्या मोसमातील जागतिक क्रिकेटमधील वेगवान शतक साकारण्याचा मानही मिळवला.

हा दौरा करोनाच्या कालखंडातील भारतीय संघाचा पहिलाच दौरा होता. त्यातही कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता शिखर धवन, हार्दिक पंड्या, मयंक आग्रवाल, लोकेश राहुल अशी तगडी फलंदाजी भरात असतानाही भारतीय संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांनी पहिल्य षटकापासून आक्रमक फलंदाजी करत धावांची सरासरी उत्तम राखली परंतु विकेट राखता न आल्याने यजमान संघावर दडपणच आले नाही. कांगारूंनी उभ्या केलेल्या 374 धावांचा पाठलाग करताना धवन व पंड्या वगळता एकाही फलंदाजाला जबाबदारीने फलंदाजी करता आली नाही. या दोघांनी अर्धशतकी फटकावूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येसमोर पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार कोहलीने या मैदानावरील आपल्या सर्वोच्च धावसंख्येलाही 21 धावा करत कायम राखले. त्याच्याकडे रनमशिन म्हणून पाहिले जात असले तरीही सध्या तो धावांसाठी याचना करताना दिसत आहे व त्यामुळे चाहत्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. त्याच्या अपयशामुळे आता पुढील सामन्यात तरी भारतीय संघ यशस्वी कामगिरी करेल का? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.