पुण्याचे डॉ. गायकवाड सिक्कीम संघाचे संचालक प्रशिक्षक

पुणे – बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वरिष्ठ प्रशिक्षक असलेल्या पुण्याच्या डॉ. अतुल गायकवाड यांची सिक्कीम क्रिकेट संघटनेच्या संचालक प्रशिक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.
संचालक प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. गायकवाड हे सिक्कीम संघटनेच्या पुरुष व महिलांच्या राज्य संघासह रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहतील.

संघटनेच्या सर्व वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या कार्यक्रमांची आखणी करणे, अंमलबजावणी करणे आणि त्यावर लक्ष ठेवणे याबरोबरच स्थानिक प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे, तरुण खेळाडूंसाठी आवश्‍यक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करीत मार्गदर्शन करणे, अशा सर्वच आघाड्यांवर ते कार्यरत असणार आहेत.

मूळचे पुण्याचे असलेल्या डॉ. गायकवाड यांनी बीसीसीआयसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक आणि शिक्षण विभागाचे सह विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले असून त्यांना तब्बल 30 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे. डॉ. गायकवाड हे एनएलपी सर्टिफाईड ट्रेनर असून प्रमाणित योग विज्ञान शिक्षक देखील आहेत.

सध्या इंग्लंड वेल्स क्रिकेट मंडळातून ते स्वत: लेव्हल 4 मास्टर कोचचे प्रशिक्षण घेत असून ईसीबी लेव्हल 4 चे प्रशिक्षण घेणारे ते पहिलेच भारतीय प्रशिक्षक असतील. भारतीय महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि एनसीए येथे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.