Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारताचं नेतृत्व करताना दिसून आला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिकाही भारताने जिंकली. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात मालिका १-१ ने बरोबरीत सोडवण्यात यश आलं. मात्र आता सूर्यकुमार यादव अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन अधिकच वाढले आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव याला दुखापत झाली होती. सूर्यकुमार यादव गेल्या आठवड्यात भारतात परतला असून त्याचं स्कॅन करण्यात आलं. यादरम्यान त्याची दुखापत गंभीर असल्याचं दिसून आलं आहे. त्याची दुखापत पाहता तो जानेवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत खेळताना दिसून येणार नाही. सूर्यकुमार यादव आता सात आठवडे क्रिकेटपासून दूर असेल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फिट अँड फाईन होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ३१ वर्षीय सूर्या दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएकडे रिपोर्ट करत आहे. आयपीएलपूर्वी फिटनेस तपासण्यासाठी तो फेब्रुवारीमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळू शकतो. तसेच हार्दिक घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हार्दिक आणि सूर्यकुमार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय निवड समिती रोहित शर्माला संघाचे नेतृत्व करण्यास सांगू शकते. त्याचवेळी इशान किशनही अफगाणिस्तानविरुद्ध खेळला नाही, तर त्याच्या जागी जितेश शर्माला संधी मिळण्याची शक्यता आहे.