एकाच मतदार संघातून इच्छुक वाढल्याने वादाची चिन्हे

नगर – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात 9 जागांवर दावा करत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी (दि.25) आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, या मुलाखतीस समिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु एकाच मतदार संघातून अनेक इच्छुक असल्याने मतदारसंघातील संभव्य उमेदवारांचा वाद मात्र चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत होते. पक्षांने उमेदवारी निश्‍चित केल्यावर मुलाखती दिलेल्यांमध्ये एकोपा राहिलका? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नगर येथील राष्ट्रावादी भवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर इच्छुकांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवीदास पिंगळे, अंकुश काकडे यांनी घेतल्या. यावेळी अनेक मतदारसंघांतून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आली. तर विद्यमान आमदारांनी मुलाखतींना दांडी मारली. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुलाखत दिली, तर आ. संग्राम जगताप व आ. वैभव पिचड यांनी दांडी मारली. त्यामुळे विद्यमान आमदारांची दांडी मारल्याने राष्ट्रवादी भवनात चर्चेचा विषय ठरला.

आ. संग्राम जगताप यांच्याऐवजी त्यांचे वडील विधानपरिषदेचे आ. अरुण जगताप हे आले होते. विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झाली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. आज नगरमधील राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 12 मतदारसंघांतील इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्जत-जामखेड येथील जागेसाठी रोहित पवार यांनी मुलाखत दिली. पारनेरमध्ये नीलेश लंके, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, लामखडे यांनी मुलाखती दिल्या आहेत, तर नीलेश लंके आणि प्रशांत गायकवाड यांनी एकमेकांना समर्थन देत इतर उमेदवारांवर गुगली टाकली आहे. अकोलेचे आ. वैभव पिचड यांची गैरहजेरी प्रामुख्याने जाणवत होती. शहरात आ. संग्राम जगताप यांच्यावतीने प्रकाश जगताप यांनी हजेरी लावली होती. माजी महापौर अभिषेक कळमकर हेही इच्छुक आहेत.

पिचडांबरोबर कपिल पवारही भाजपच्या वाटेवर?

नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोलेचे आ. वैभव पिचड यांनीही पक्षाच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली असल्याने, आ. पिचड हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
आ. पिचड यांनी ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला पुष्टी मिळत आहे. पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच आ. पिचड यांनी राष्ट्रवादीच्या मुलाखतीस दांडी मारल्याने ते भाजपात प्रवेश करतात की शिवसेनेत असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

संगमनेर मधिल कपिल पवार यांचे वरदहस्त पिचड मानले जाते. जर पिचड हे भाजप मध्ये गेले तर कपिल पवार हे देखिल भाजपच्या वाटेवर जातील का? असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे. कारण पिचड हे त्यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)