नवी दिल्ली – भारतामध्ये असंतुलीत विकास होत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सर्व समावेशक विकासासाठी आणि कमकुवत गटाच्या सबलीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी व्यक्त केले. भारताबाबत मायक्रोसॉफ्ट आशावादी असून भारतामध्ये अनेक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बॅंकर्स समितीकडून अटल निवृत्ती वेतन योजनेबाबत आढावा बैठक
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी आणि इतर व्यवसायिकांच्या बैठकीत बोलताना नडेला यांनी सांगितले की, जगात तंत्रज्ञानामुळे लोकोपयोगी कामात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून येत आहे. भारतातही सबलीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाऊ शकतो. तंत्रज्ञानाचा विकास आणि आर्थिक विकास हा सर्वसमावेशकतेसाठी वापरला गेला पाहिजे. अन्यथा त्यामुळे दुष्परिणाम उद्भवू शकतात.
मायक्रोसॉफ्ट मेक इन इंडिया धोरण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारतामध्ये मायक्रोसॉफ्ट गुंतवणूक करीत आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नडेला सध्या भारतभेटीवर आहेत. काल त्यांनी मुंबईला भेट दिल्यानंतर आज दिल्लीला भेट दिली. नंतर ते बंगलूरु आणि हैदराबाद शहरांमध्ये विविध क्षेत्रातील तंत्रज्ञांना व विद्यार्थ्यांना भेटणार आहेत.