पुणे – अटल निवृत्तीवेतन योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य स्तर अग्रणी बॅंकर्स समितीने दिनांक 4 जानेवारी रोजी पुणे येथे अटल निवृत्तीवेतन योजना आढावा बैठक आयोजित केली. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजय कुमार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी व निवृत्तीवेतन निधी नियमन व विकसन प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक ए जी दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
“चांद्रयान-3’चे लवकरच प्रेक्षपण; इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली माहिती
ए बी विजय कुमार यांनी सर्व सभासद बॅंकांना अटल निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावात सक्रियपणे घेऊन जाण्याचे आवाहन केले. दास यांनी लोकांना त्यांच्या वृद्ध वयात सुरक्षित उत्पन्न मिळण्याच्या गरजेवर भर दिला. निवृत्तीवेतन निधी नियमन व विकसन प्राधिकरणाचे सहाय्यक सरव्यवस्थापक डॉ आशिष डोंगरे यांनी योजनेची वैशिष्टये व लाभाची माहीती देणारे सादरीकरण केले.
देशातील 4.95 कोटी वर्गणीदरांनी अटल निवृत्ती वेतन योजनेत नोंदणी केली आहे. निवृत्तीवेतन निधी नियमन व विकसन प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य स्तर अग्रणी बॅंकर्स समिती हे अटल निवृत्ती वेतन योजनेत नोंदणी होण्यासाठी प्रयत्न जारी ठेवतील असे दास यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्तर अग्रणी बॅंकर्स समितीचे सदस्य सचिव व उपसरव्यवस्थापक आर डी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. .