भोपाळ – मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील भिंड गावात प्रवासी बस आणि कंटेनरमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत एका महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून, उपचारासाठी त्यांना ग्वाल्हेरला पाठवण्यात आले आहे. ही दुर्घटना भिंडमधील राष्ट्रीय महामार्ग 92 वर गोहाड चौकाजवळ घडली.
ग्वाल्हेरहून उत्तर प्रदेशातील बरेलीला भिंड मार्गे प्रवासी बस जात होती. ही बस गोहाड चौकाजवळ आली असता भिंडकडून गोहाडच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कंटेनर बसला धडकून दरीत कोसळला.
या धडकेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व जखमींना गोहाड रुग्णालयात पाठवले आहे. तसेच सात जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेत. पोलिसांनी 7 पैकी 4 मृतांची ओळख पटवली आहे.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी सतीश कुमार आणि पोलीस अधीक्षक मनोज सिंह यांनीही घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच कंटेनर चालकाला अटक केली आहे.