पुणे – सायकलींच्या पुणे शहराची ओळख आता वाहनांचे शहर म्हणून होत आहे. 2020 मध्ये शहरातील वाहनांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. 2019 च्या तुलनेत वाहनविक्रीत घट झाली असली तरी, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुमारे दीड लाख वाहनांची वर्षभरात नोंद झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये सुमारे 4 महिने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. याच कालावधीत गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया असे शुभमुहूर्त असणारे सण होते. यासह अनेकांना लॉकडाऊनकाळात आर्थिक फटका बसला. त्यामुळे याचा परिणाम वाहन व्यवसायावर होईल, अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हे अंदाज मोडीत काढत, मागील वर्षीच्या तुलनेत वाहननोंदणी कमी असली तरी, सुमारे दीड लाख वाहनांची वर्षभरात नोंद झाली आहे.
2019 च्या तुलनेत 2020 मध्ये वाहनविक्री सुमारे 38.16 टक्क्यांनी घटली आहे. 2019 मध्ये सुमारे 2 लाख 44 हजार 533 वाहनांची नोंद झाली होती. तर, 2020 मध्ये 1 लाख 51 हजार 224 वाहनांची नोंदणी झाली. यापैकी 13 हजार 318 व्यावसायिक वाहने (प्रवासी, मालवाहू आदी) आणि 1 लाख 37 हजार 906 खासगी वाहने आहेत.
यामध्ये सर्वाधिक दुचाकी असून, तब्बल 98 हजार 523 दुचाकींची नोंद झाली आहे. त्या खालोखाल सुमारे 38 हजार 897 हलक्या मोटार वाहनांची नोंद झाली आहे. 2020 च्या जानेवारीमध्ये 23 हजार 425 अशी सर्वाधिक वाहननोंदणी झाली होती. तर, अनुक्रमे नोव्हेंबरमध्ये 21 हजार 076 वाहनांची नोंदणी झाल्याचे चित्र आहे.