टोकियो – जपानमध्ये पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढल्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हा धोका आणखी वाढला तर मात्र, ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे आयोजित करणे कठीण आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने व्यक्त केले आहे.
टोकियोसह जपानमधील काही राज्यांत करोनाचा धोका वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय सुरक्षा आणीबाणी जाहीर करण्यात आली जपानमध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.
जपानमध्ये जवळपास 3 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे देशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, असे जरी आयोजक सांगत असले तरी ते कठीण असल्याचेही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त केले आहे. येत्या 23 जुलै ते 8 ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.
जपानमधील नागरिकांनी ऑलिम्पिकचे आयोजन या स्थितीत केले जाऊ नये, अशी मते व्यक्त केली असल्याने जपान सरकारही याबाबत नकार दर्शवत आहे. जुलै व ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीच्या नव्या अर्थसंकल्पात 15.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढ होणार आहे.