मंचर -ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये वाढ झाल्याने पोल्ट्री व्यावसायाला चांगले दिवस आले आहेत. किरकोळ विक्रेते ग्राहकांना 200 ते 220 रुपये किलो दराने चिकन विकत असल्याचे दिसून येते आहे.बाजारभाव वाढल्याने पोल्ट्री व्यवसायिक खूश तर खवय्ये नाराज झाले आहेत.
सरकारने परिपत्रकाद्वारे ब्रॉयलर चिकन, अंडी, मटण,मासे आरोग्यासाठी पोषक असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सध्या नागरिकांचा चिकन खाण्याकडे कल जास्त आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून 180 रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे 220 रुपये किलो दराने चिकन मिळत आहे. घाऊक बाजारात किरकोळ चिकन विक्रेत्यास 133 रुपये किलो दराने माल मिळत आहे.
ब्रॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये अशीच दरवाढ रोज होत राहिली तर लवकरच या कोंबडीचे चिकन 250 रुपये किलोची पातळी गाठण्याची शक्यता आहे. आंबेगाव तालुक्यात जवळपास सहाशे ते सातशे पोल्ट्री फार्म आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म उभारले आहेत; परंतु मध्यंतरी बहुतांशी शेतकऱ्यांचे आणि कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने काही पोल्ट्री फार्म बंद असून, बाजारात मालाचा तुटवडा जाणवत असल्याने दिवसेंदिवस लिफ्टिंग रेटमध्ये वाढ होत असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
मटणालाही मागणी वाढली
मटणालाही मागणी वाढत असून मटण सध्याच्या स्थितीत 660 ते 700 रुपये किलो दराने मिळत आहे. चिकन व मटण व्यवसायिक फोनद्वारे ऑर्डर घेवून सरकारच्या नियमांनुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत.