मैदुगिरी (नायजेरिया): नायजेरियातील ईशान्येकडील एका गावात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये किमान 20 जण ठार झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी रमझानचा उपवास सोडण्याच्या तयारीत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. गाजिगाना या गावाच्या एका बाजूला सुरक्षा रक्षक तैनात केले गेलेले होते. पण दहशतवाद्यांनी विरुद्ध बाजूने गावात हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि ते सैरावैरा पळायला लागले होते, असे काही साक्षीदारांनी सांगितले.
अनेक आठवड्यांचे उपवास आणि तब्बल 42 अंश तापमानामुळे अशक्त झालेले 20 जण दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडले. तर 25 जण जखमी झाले. ईशान्य नायजेरियात बोको हराम एका दशकापेक्षा जास्त काळ बंडखोरी करत आहे. बोको हरामच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 20 हजार जण ठार झाले आहेत, तर 70 लाखांपेक्षा अधिक जणांना मानवतावादी सहकार्य अत्यावश्यक भासले आहे.