मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याआधी तिची कसून चौकशी करण्यात आली होती. केतकीला आज ठाणे सत्र न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मागील सुनावणीवेळी केतकी चितळेनी न्यायालयात स्वतः युक्तिवाद केला होता. केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तिने केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने केतकीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केतकीच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.
यात तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात आता सायबर सेलचीही मदत घेण्यात येणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. केतकीच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या तपासात आणखी काय बाहेर येणार हे पाहणे गरजेचे आहे.