गोंदिया- भंडारा जिल्हा पोलीस दलात कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. हा पोलीस कर्मचारी तुरुंगातील काही आरोपींना न्यायालयात घेऊन जात होता त्या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या घटनेनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रशेखर ब्रिजलाल बिसेन असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बिसेन हे भंडारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. दरम्यान कर्तव्यावर असताना ते गोंदियाच्या न्यायालयात काही आरोपींना घेऊन आले. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बिसेन यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना घरी नेण्यात आले मात्र घरी त्यांना आणखीच त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना पुन्हा गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.