पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी आणि फेरमूल्यांकन यांच्यात 50 रुपयांनी वाढ केल्याने वाद निर्माण होत असताना आता विद्यापीठाने नवीन रचनेतून विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा भार टाकला आहे. येत्या वर्षापासून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा विरोध होण्याची चिन्हे आहेत.
2016 च्या सुधारित महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने त्यांचा अहवाल कुलगुरू डॉ. करमळकर यांना सादर केला. हा अहवाल स्वीकारून नवीन वर्षासाठी विद्यापीठाने शुल्कनिश्चिती केली आहे. 2020-21 पासून अभ्यासक्रमानुसार एक-दोन हजार ते 10 हजार रुपयांपुढे ही शुल्कवाढ आहे.
9 वर्षांनंतर वाढ
निश्चित केलेल्या शुल्कामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतील अभ्यासक्रमांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. यामध्ये विशेषतः विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी ही वाढ केली गेली आहे, असे दिसून येते. दरम्यान, 2011-12 मध्ये शैक्षणिक शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.