पिंपरी – सध्या शहरात गणशोत्सवाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपातील अनेकजणांनी पक्षांतराची तयारी पूर्ण केली आहे. भाजपाच्या भ्रष्ट आणि नात्यागोत्याच्या राजकारणाला अनेकजण वैतागले असून गणेश विसर्जनानंतर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग होण्यास सुरुवात होणार आहे. अनेकांनी अजितदादांशी संपर्क केला असून काहीजण स्थानिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल, असा दावा बनसोडे यांनी केला. महापालिका निवडणुकीला अवघे सहा महिने उरलेले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने केलेल्या या दाव्याने आधीपासूनच सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त बनसोडे आले होते. त्यावेळी डिजिटल प्रभातसाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर परखडपणे आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना बनसोडे यांनी महाविकास आघाडीने गेल्या पावणे दोन वर्षांत राज्य शासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले.
बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची पंधरा वर्षे सत्ता होती. या सत्तेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या विकासासाठी वापर केला. नागरिकांच्या स्वप्नातील शहर प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र गतवेळी झालेल्या निवडणुकीत 22 लाखांच्या मूर्ती घोटाळ्याचा खोटा आरोप भाजपच्या नेत्यांनी करून राष्ट्रवादीला बदनाम केले. नागरिकांनीही त्यांना कौल दिला. मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता गेल्या साडेचार वर्षांत भाजपला करता आली नाही.
लाचखोरीमुळे शहराची बदनामी देशपातळीवर झाली. शाईफेक प्रकारामुळे त्यामध्ये भरच पडली आहे.
गेल्या साडेचार वर्षांत भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेतील सत्तेचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी केला असून भ्रष्ट मार्गाने पालिकेची तिजोरी लूटली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत महापालिकेत सत्तांतर अटळ असून आम्ही केवळ आणि केवळ विकास हाच अजेंडा निवडणुकीमध्ये ठेवणार आहोत. सत्ता मिळाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या वेगवान विकासाचे शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वासही बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
भ्रष्टाचारी “ब्रेन’ समोर येईल
स्थायी समितीचे अध्यक्ष लाचखोरी प्रकरणी पकडले गेले असले तरी ते एक प्यादे. भाजपात भ्रष्टाचार करयला लावणारी मंडळी वेगळी असून भ्रष्टाचार करायला लावणारे “ब्रेन’ शोधण्याची गरज असल्याचे मत अण्णा बनसोडे यांनी केले. यासाठी महापालिकेत गेल्या साडेचार वर्षांत विकासकामांच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली असून ही चौकशी झाल्यास “भ्रष्टाचारी ब्रेन’ नक्कीच समोर येईल, असेही बनसोडे म्हणाले.
विकास हाच राष्ट्रवादीचा अजेंडा
शहराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेचा कारभार आणि विकास पाहिला आहे. गतेवळी विरोधकांच्या हाती सत्ता गेल्यानंतर शहर विकासापासून दूर गेले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत नागरिक राष्ट्रवादीला संधी देतील, याचा विश्वास असून महापालिका निवडणुकीमध्ये शहराचा विकास हाच राष्ट्रवादीचा अजेंडा असेल, असे मत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाकडे पुरावे सादर करणार
भाजपाने गेल्या साडेचार वर्षांत महापालिकेत सत्तेचा गैरवापर करत विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करत असून लवकरच ते उपमुख्यमंत्र्यांना सादर केले जाणार आहेत. या पुराव्याच्या माध्यमातून महापालिकेतील विकासकामांची चौकशी केली जाईल, अशी माहिती बनसोडे यांनी यावेळी दिली.