निवासी आणि व्यासायिक मिळकतींसाठी 5 ते 10 टक्के वाढ
पुणे – लष्कर परिसरातील निवासी आणि व्यावसायिक मिळकतींच्या कराची पुनर्रचना करण्यात आली असून, नवीन रचनेनुसार निवासी आणि व्यासायिक मिळकतींवर सोमवारपासून अनुक्रमे पाच आणि दहा टक्क्यांची करवाढ लागू झाली आहे. त्यानुसार, किती मिळकतकर भरावा लागणार, याचे तपशील रहिवाशांना सोमवारपासून बोर्डाच्या कार्यालयात पाहता येणार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची त्रैवार्षिक मिळकतकर पुनर्रचना 2008 पासून तीन वर्षांनी लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आधीच्या तीन वर्षांची कर थकबाकी रहिवाशांना भरावी लागते. 2017 -20 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करनिश्चिती करण्यास बोर्डाला 2020 चा मुहूर्त उजाडला आहे. त्यामुळे बोर्डाने 2017 पासून आतापर्यंतची थकबाकी असलेली बिले मिळकतधारकांना पाठवली आहेत. या देयकांवर सुमारे आठशे मिळकतधारकांनी आक्षेप नोंदवला होता. यावर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सुनावणी घेतली होती. त्यानंतर कर पुनर्रचनेची ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारपासून बोर्डातील रहिवाशांना सुधारित मिळकतकर लागू झाला आहे. यामुळे नागरिकांना 2017 पासूनची कर थकबाकी भरावा लागणार आहे.
बोर्डाने निवासी, कारखान्यांच्या मिळकतीत 5 टक्के, तर व्यावसायिक मिळकत करात 10 टक्क्यांची वाढ केली आहे. तर शाळा-महाविद्यालयांचे मिळकतकर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. करवसुलीतून बोर्डाला सुमारे 27 कोटी रुपये महसूल मिळतो. मिळकतकराची वाढ अंमलात आल्यानंतर या महसुलात वाढ होऊन सुमारे 30 कोटी रुपये बोर्डाच्या तिजोरीत जमा होणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दिली.