पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी दिलेले 3 कोटी 7 लाख रूपये रकमेचे 124 धनादेश बाऊन्स झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे बॅंक खात्यावर पैसे न ठेवता महापालिकेला धनादेश देणाऱ्या मालमत्ता धारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शहरात 5 लाख 68 हजार मिळकतींची नोंद आहे. कर संकलन विभागाला 2021-22 मध्ये 900 कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. गुरूवारअखेर मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरीत 415 कोटी रूपये जमा झाले आहेत. मात्र, कर संकलन विभाग अजूनही सुमारे 500 कोटी रूपये उदिष्टापासून दूर आहे. त्यामुळे महापालिकेने कर वसुलीसाठी कडक पावले उचलली आहेत.
शहरातील विविध भागात कर भरण्यासाठी महापालिकेने 16 झोनमध्ये व्यवस्था केली आहे. या माध्यमातून अनेक मालमत्ताधारक महापालिकेला ऑनलाइन तर काही जण धनादेशाव्दारे कर भरत असतात. परंतु काहींचे धनादेश खात्यात पैसे नसणे वा अन्य कारणांनी बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे पालिकेला धनादेश न वाटण्याचा भुर्दंड बसून कागदोपत्री काम वाढते. तसेच त्या थकबाकीदारांकडून कर वसुलीला विलंब होतो. 2021-22 या आर्थिक वर्षात फेब्रुवारीअखेर कर भरण्यासाठी नागरिकांनी दिलेले 3 कोटी 7 लाख रूपये रकमेचे 124 धनादेश बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. धनादेश न वाटल्याबाबत गुन्हा का दाखल करू नये म्हणून महापालिका नोटीस देणार असून प्रत्येकी दोनशे रूपये दंडही वसूल करण्यात येणार आहे.
झोननुसार बाऊन्स झालेल्या धनादेशाची संख्या
थेरगाव झोनमध्ये-25, सांगवी झोनमध्ये-20, मनपा भवन, चिंचवड आणि चिखली, किवळे प्रत्येकी 10, निगडी प्राधिकरण-9, भोसरी-8, आकुर्डी-4, तळवडे आणि मोशी प्रत्येकी-4, पिंपरीनगर-3, फुगेवाडी-दापोडी-3, दिघी बोपखेल-3, चऱ्होली आणि पिंपरी वाघेरे प्रत्येकी 1
महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी जास्तीत-जास्त मिळकत कर वसुल होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणाचीही हयगय केली जाणार नाही. महापालिकेला मिळकत करांपोटी प्राप्त झालेल्या धनादेशापैकी 3 कोटी 7 लाख रूपयांचे 124 धनादेश बाऊन्स झाले आहेत. ज्या मालमत्ताधारकांचे धनादेश बाऊन्स झाले आहेत, त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यांना पैसे भरण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येईल. या मुदतीत कर न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मार्चअखेर पर्यंत जास्तीत-जास्त मिळकत कर
कशाप्रकारे वसुल होईल, यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
– निलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग.
=================