नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत दहा नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अधिकृत प्रसिद्धीनुसार, तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बंदी संजय कुमार, राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष सतीश पुनिया, आंध्र प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष सोमू वीरराजू यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांची सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या कार्यकारीणीत नियुक्ती केली आहे.या खेरीज सुरेश कश्यप, संजय जैस्वाल, विष्णू देव साई, धरमलाल कौशिक, अश्वनी शर्मा, बंदी संजय कुमार, सोमू वीरराजू, दीपक प्रकाश, सतीश पुनिया, किरोडी लाल मीना,यांचाहीं राष्ट्रीय कार्यकारीणीत समावेश करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, शुक्रवारी भाजपने राजस्थान, छत्तीसगड तेलंगणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भाजपचे राजस्थान निवडणूक प्रभारी म्हणून, तर गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि हरियाणाचे नेते कुलदीप बिश्नोई यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओम प्रकाश माथूर यांची छत्तीसगड निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी म्हणून तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्याचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांची पक्षाच्या तेलंगणा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुनील बन्सल यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.