पिंपरी – आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल ऍवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन (ग्वांगझू ऍवॉर्ड) पुरस्कारासाठी जगभरातील पंधरा शहरांच्या यादीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. त्यासाठी महापालिका शाळांमधील शैक्षणिक नाविन्यतम प्रकल्प अधोरेखीत करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी समावेश झालेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड हे देशात एकमेव शहर ठरले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
सन 2012 पासून सिटी ऑफ ग्वांगझू, युसीएलजी आणि मेट्रोपोलीसद्वारे सह-प्रायोजित शहरात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ग्वांगझू इंटरनॅशनल ऍवॉर्ड देण्यात येतो. ज्ञान निर्मितीला चालना देण्यासाठी आणि शहरी नावीन्यतेमध्ये शिक्षण सुलभ करण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ही संकल्पना उदयास आली आहे. गेल्या पाच टप्प्यांमधून जगभरात 1300 हून अधिक उपक्रम सादर करण्यात आले. सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या शहरी विकासाला यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला होता.
जगभरातील विविध देशांमधील 193 शहरे आणि प्रदेशांमधील तब्बल 274 उपक्रमांनी ग्वांगझू पुरस्काराच्या 6 व्या फेरीसाठी अर्ज सादर केले. यामध्ये पिंपरी-चिंचवडची निवड खूप महत्त्वाची ठरली आहे. पुरस्कार प्रक्रियेतील सादरीकरण मूल्यांकनासाठी 11 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान ग्वांगझू लायब्ररीमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असलेली एक तांत्रिक समिती बोलाविण्यात आली होती. समितीमार्फत शाश्वत विकास उद्दिष्टे, न्यू अर्बन अजेंडाच्या स्थानिक अंमलबजावणीच्या पाठपुराव्याशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली. यामध्ये, निवड प्रक्रिया, नवकल्पना, परिणामकारकता, संदर्भ आणि प्रतिकृती यासारखे निकष लावण्यात आले होते. यातून निवड झालेल्या 45 पात्र उपक्रमांपैकी अंतिम 15 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे.
ही आहेत शहरे
या पुरस्कारासाठी समावेश झालेले देशातील पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे. त्याचबरोबर अंतल्या (तुर्किये), बोगोटा (कोलंबिया), केप टाउन (दक्षिण आफ्रिका), ग्वांगजू (कोरिया), हलांद्री (ग्रीस), इज्तापालापा (मेक्सिको), जकार्ता (इंडोनेशिया), कंपाला (युगांडा), कझान (रशिया), मॅनहाइम (जर्मनी), रामल्लाह (पॅलेस्टाईन), साओ पाउलो (ब्राझील), तेहरान (इराण) आणि झियानिंग (चीन) ही जगभरातील शहरे शहरी नवकल्पनांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिळालेले हे यश पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी गौरवाची बाब आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा सहभाग हे नावीन्यपूर्ण शहरी उपायांबद्दलचे समर्पण प्रतिबिंबित झाले आहे. आमचे अनुभव जगासोबत मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. विकास आणि शहराची प्रगती पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.
आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड महापालिका