वाघोली – वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यानंतर शासकीय, शाळांच्या इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली असली तरी शिक्षकांच्या समावेशाची प्रक्रिया प्रलंबित राहीली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये बदलीच्या भीतीची अस्वस्थता निर्माण झाली असून आम्हालाही महापालिकेत समाविष्ट करा अशी आर्त हाक देत वाघोलीतील जिल्हा परिषद शिक्षकांनी वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे यांना निवेदन देत कैफियत मांडली.
महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार वाघोलीसह एकूण २३ गावांचा नव्याने पुणे महापालिका क्षेत्रात समावेश केला असून महापालिकेने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय इमारती ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी शाळाभेटी सुरू केल्या असून इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या समावेशाबाबत अधिकारी किंवा पदाधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
यादरम्यान शिक्षकांना जर महापालिकेत वर्ग केले नाही तर या तीन वर्षांपूर्वी घेतलेले ११ व आत्ताची २३ अशी एकूण ३४ गावांतील शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातील रिक्त जागांवर झाल्यास बसलेली आयुष्याची घडी पुन्हा विस्कटणार अशी भीती येथील सध्या कार्यरत शिक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. या शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमध्ये बहुतांश महिला शिक्षिका असून त्यातही संवर्ग एक आणि संवर्ग दोन तसेच दिव्यांग शिक्षकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वाघोलीतील शिक्षकांनी आम्हाला महापालिकेत समाविष्ट करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सरपंच वसुंधरा उबाळे यांना दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे पालिकेचे आयुक्त आणि महापौर यांच्याशी चर्चा करून शिक्षकांच्या समावेशाची समस्या सोडविण्यात येणार आहे.
शिवदास उबाळे
माजी सरपंच, वाघोली