सातारा – येथील जुनी औद्योगीक वसाहत परिसरातील गणेश चौकातलगत असलेल्या रिकाम्या जागेत चरणाऱ्या आठ शेळ्या चोरूणार्या दोघांना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कराड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन शेळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मात्र, इतर संशयित फरार होण्याच्या भितीने पोलिसांनी ताब्यातील संशयितांचे नावे सांगण्यास नकार दिला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 6 रोजी मंगल विश्वनाथ माने (रा.धनगरवाडी,सातारा) यांनी त्यांच्या मालकीच्या शेळ्या जुनी औद्योगीक वसाहत परिसरातील गणेश चौकातलगत असलेल्या रिकाम्या जागेत चरण्यासाठी सोडल्या होत्या. दरम्यान रिकाम्या जागेत चरणाऱ्या 28 हजार रूपये किंमतीच्या आठ शेळ्या अज्ञाताने चोरून नेल्या होत्या.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आज कराड येथे चोरलेल्या शेळ्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती.