प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –पुणे शहर, उपनगर तसेच ग्रामीण भागातून गेल्या काही महिन्यांपासून महिला गायब होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात 840 महिला गायब झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे.
जिल्हा पोलिसांनी गुरुवार (दि. 28) पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून या जुलै महिन्यांपर्यंत 840 महिला बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 396 महिलांची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सर्वाधिक जून महिन्यांत 186 महिला त्यानंतर मे महिन्यांत 135 महिला बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस हद्द तसेच पुणे ग्रामीण पोलिसांकडून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आलेल्या आहेत.
काय आहे कारण?
महिला घरातून अचानक गायब होण्यामागे कुटुंबातील कलह, नोकरीचा शोध आदी कारणे आहेत. 16 ते 25 वयोगटातील महिलांकडून असा घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही गुन्ह्यात घरी परतणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानवी तस्करीचाही संशय…
महिला गायब होण्यात मानवी तस्करी असल्याचाही संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मानवी तस्करांकडून कुटुंबातील वाद, प्रेमात फसवणूक, अवैध संबंध यातून हेरल्या जातात. काहींचे अपहरणही केले गेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.