पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) –पिंपरी-चिंचवड महापलिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या 68 कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. महापालिका आयुक्तांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या 68 कर्मचाऱ्यांची प्रशासनाने अन्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केली. यामध्ये आरोग्य मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा बदलीला विरोध नाही. मात्र, प्रभागांतर्गत बदली व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, लाला गाडे, दिलीप गुंजाळ, नितीन समगीर, विटकर आदी प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
“पीएमपी’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी पीएमपीएमएल कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे याच्याकडे केली. यावर आमदार लांडगे यांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. यावर संबंधित कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.